मैतर जिवाचे – फोटो मागची गोष्ट

या फोटोत सगळे हसरे चेहरे दिसत आहेत. फोटो पाहणाऱ्याला कदाचित असे वाटेल की या चेहऱ्यांवरचे समाधान म्हणजे क्षुधाशांतीचे समाधान असावे, कारण मागे श्यामसुंदर मिसळचा बोर्ड दिसतोय! पण खरं सांगायचं तर, या चेहऱ्यांवर दिसणारे समाधान हे पोट भरल्याचे नसून मित्रांच्या भेटीचे आहे!

आता मी तुम्हाला या फोटोमागची गोष्ट सांगणार आहे.

हे सर्वजण आहेत संडे टी क्लबचे सदस्य. एकेकाळी एका नामांकित आणि प्रगतिशील कंपनीत एकत्र काम केलेले हे सगळे मित्र. वयाची साठी ओलांडलेले असले तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि चैतन्य मात्र तरुणाईला लाजवेल असे आहे.

आज सर्वजण निवृत्त जीवनाचा आनंद घेत आहेत आणि आयुष्याचा एक नवा, सुंदर सुवर्णकाळ अनुभवत आहेत. प्रत्येकजण रविवारची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण रविवारी सकाळी सगळेजण चहाच्या निमित्ताने एकत्र जमतात. चहा हे केवळ निमित्त असते; खरी ओढ असते ती मित्रांच्या भेटीची!

या चहाच्या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, किस्से सांगितले जातात, विनोदांची देवाणघेवाण होते आणि एक तास कसा निघून जातो ते कळतही नाही. या गप्पांमध्ये कोणी कोणाला जज करत नाही, कोणी कोणावर टीका करत नाही. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे आणि मनमोकळेपणाने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असते. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर पद, प्रतिष्ठा, यशापयश या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचे महत्त्व कळलेले असते.

मैत्री ही अशीच एक सुंदर गोष्ट आहे. त्यात राग, रुसवे, मतभेद असतात; पण ते क्षणिक असतात. कारण मैत्रीचा पाया हा एकमेकांवरील विश्वास आणि आपुलकीवर उभा असतो.

या प्रत्येक चेहऱ्यामागे साधारण ३० ते ३५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ होता. निवृत्तीपूर्वी कोणी मोठ्या पदावर होते, तर कोणी लहान पदावर. पण आज या सगळ्या पदांना काहीच अर्थ उरलेला नाही. आता सर्वजण फक्त मित्र म्हणून एकत्र येतात.

यावेळी मला एक गंमतीशीर म्हण आठवते. निवृत्तीनंतर प्रत्येक माणूस हा जणू फ्यूज झालेल्या बल्बसारखा असतो. तो पूर्वी किती वॅटचा होता, किती प्रकाश देत होता, याला फ्यूज झाल्यानंतर काहीच महत्त्व उरत नाही! आणि विशेष म्हणजे, आम्ही सगळे ही म्हण प्रत्यक्ष जगत आहोत. पूर्वीची पदे, अधिकार आणि जबाबदाऱ्या मागे पडल्या आहेत. उरली आहे ती फक्त मैत्री!

हे सगळे शक्य झाले ते एका मित्रामुळे. त्याचे नाव आहे राजाभाऊ वाटवे.

या संदर्भात मला हिंदीतील एक प्रसिद्ध शेर आठवतो:

मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर,
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया।

राजाभाऊंची गोष्टही अगदी अशीच आहे. सुरुवात झाली ती दोघांपासून आणि आज या परिवारात तीसहून अधिक मित्र सहभागी झाले आहेत.

राजाभाऊ म्हणजे खऱ्या अर्थाने जगन्मित्र! कायम हसतमुख, सर्वांना आपलेसे करणारे आणि कोणाच्याही मदतीला तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व. मी माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती पाहिली आहे, जी आपल्या मित्रांसाठी देवाकडे मनापासून मागणे मागते आणि देवही जणू तिचे ऐकतो! तर असे हे राजाभाऊ या संडे टी क्लबचे संस्थापक आहेत.

मी असे म्हटले तर वावगे ठरनार नाही की हा तीस मोत्यांचा हार ज्या धाग्यात गुंफला आहे तो धागा म्हणजे राजाभाऊ वाटवे.

अशा या आमच्या मित्रमंडळींची दर रविवारी सकाळी भेट होते. चहाच्या घोटांबरोबर गप्पांचा फड रंगतो, एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस होते आणि शक्य असेल तिथे एकमेकांना मदतीचा हातही दिला जातो. या भेटी केवळ रविवारची सकाळ आनंदी करत नाहीत, तर आठवडाभर मनात एक वेगळाच उत्साह आणि आनंद टिकवून ठेवतात.

या सगळ्या अनुभवातून पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित होते – तुम्ही आयुष्यात किती वर्षे जगलात यापेक्षा, ती वर्षे कशी जगलात हे अधिक महत्त्वाचे आहे.

खरंच, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही नाती आपल्याला नव्याने जगण्याची उमेद देतात. संडे टी क्लब हे त्याचेच एक सुंदर उदाहरण आहे.

या मित्रांबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. पण आज इथेच थांबतो. कारण काही भावना शब्दांपेक्षा अनुभवण्यातच अधिक आनंद असतो!

धन्यवाद 🙏


Discover more from Awesomeplaces

Subscribe to get the latest posts sent to your email.

Published by Mukund Karadkhedkar

Engineer by profession and Wildlife Photographer by passion. Loves nature.

Leave a Reply

Discover more from Awesomeplaces

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading