नायगरा धबधबा – निसर्गाचे विराट रूप व मनाला स्पर्शणारा अनुभव

नायगारा धबधबा : गर्जना प्रचंड , सौंदर्य मनमोहक, अन सान्निध्य विलक्षण शांतीदायी
हा माझा अनुभव आहे आणि मी तो शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती नाही की सर्वांचा अनुभव असाच असतो का ते. मात्र मला अशीच अनुभूती मिळाली.
त्याच्या प्रचंड पाण्याचा गडगडाट आसमंत व्यापून टाकतो, त्याचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यांना मंत्रमुग्ध करते, पण त्याच वेळी त्याच्या सानिध्यात मनाला विलक्षण शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते.
नायगराचे वर्णन करताना एवढेच माझ्या मनात येते की – “गर्जना प्रचंड, सौंदर्य मनमोहक, अन सान्निध्य विलक्षण शांतीदायक”.
नायगारा ला जायचे ठरल्यावर मी थोडासा अभ्यास केला आणि काही माहिती मिळवली. जी माहिती मिळाली ती थोडीशी भीतीदायक होती. दर सेकंदाला साधारण साडेसात लाख गैलन पाणी १०० ते १८० फुटांवरून खाली कोसळते. हे वाचून हा धबधबा किती विराट आणि प्रचंड असणार आहे याची कल्पना येते. त्यामुळे ही मानसिकता घेऊन आम्ही नायगारा येथे गेलो होतो आणि माझा अनुभव खूपच वेगळा होता.
इथे एकूण तीन धबधबे आहेत, हॉर्स शू फॉल्स, अमेरिकन फॉल्स आणि ब्राइडल वैल फॉल्स. यापैकी हॉर्स शू फॉल्स हा कॅनडा मधून संपूर्ण दिसतो. बाकीचे दोन अमेरिकन साइड ने दिसतात. एवढा प्रचंड पाण्याचा प्रवाह एवढ्या उंचीवरून वेगाने खाली येतो हे दृश्य विचार करायला लावणारे होते.
जेव्हा आम्ही खूप उंचीवरून खाली झेपावणाऱ्या पाण्याच्या त्या रौद्र रूपाकडे पाहत होतो तेव्हा खूप छान वाटत होते, बिलकुल मनात भीती नव्हती, उलट एक शांततेचा अनुभव आला. आणि त्यामुळेच मी याचे वर्णन गर्जनेतील शांतता असे केले आहे. यातून मला एवढेच व्यक्त करायचे आहे की “निसर्गातील प्रचंड शक्ती आणि मनाला लाभलेली विलक्षण शांतता” असा माझा अनुभव होता.

आणि या सौंदर्यात भर पडली ती म्हणजे फॉल कलर्स ने. धबधब्याच्या सौंदर्यात सभोवताली असलेली रंगीबेरंगी झाडे अजूनच भर घालत होती. नायगारा धबधबा हा नायगारा फॉल्स स्टेट पार्क, अमेरिका येथे आहे. हा पार्क अतिशय सुंदर असून येथील स्वच्छता वाखाणण्या योग्य आहे.

इथे येणाऱ्या पर्यटका साठी खूप छान सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही बोटीमध्ये बसून अगदी धबधब्या जवळ जाऊन येऊ शकता. त्याला मेड ऑफ द मिस्ट असे म्हणतात. तो एक रोमांचकारी अनुभव असतो. तुम्हाला रेनकोट देतात. पण तुम्ही भिजण्याचा आनंद घेऊ शकता. कारण पाण्याचे फवारे इतके जोरात असतात की तुम्ही कोरडे राहूच शकत नाही.




हा अनुभव सुद्धा खूप छान होता. डबल डेकर बोट मधे वरच्या मजल्यावर जाऊन धबधब्याकडे बघणे हा एक वेगळाच अनुभव असतो. खूप जोरात वारे वाहत असतात आणि त्या वाऱ्याबरोबर पाण्याचे फवारे देखील येतात. खूपच अवर्णनीय अनुभव होता.
नायगराचे रात्री चे रूप काही वेगळेच असते. पाण्याच्या प्रवाहात रंगीत लाइट्स सोडतात. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रंगीत दिसतो. खूपच वेगळा अनुभव असतो. खालील फोटोत तुम्ही पाहू शकता.

संपूर्ण अनुभव कथन वाचल्या बद्दल धन्यवाद. तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो. कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा.
आनंदी रहा आणि हासत रहा.
Discover more from Awesomeplaces
Subscribe to get the latest posts sent to your email.