ऑटम : निसर्गाचा रंगोत्सव आणि जीवनाचा संदेश

आजपर्यंत मला पावसाळा हा ऋतू खूप आवडायचा. परंतु अमेरिकेतील Autumn किंवा Fall — ज्याला आपण मराठीत पानगळ म्हणू शकतो — हा ऋतू पाहिला आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो!

भारतातील पावसाळा म्हणजे निसर्गाच्या पुनर्निर्मितीचा काळ. संपूर्ण चराचर सृष्टी जणू या कार्यात स्वतःला झोकून देते आणि सजीवांना नवजीवनाच्या प्रवासात साथ देते. या ऋतूत निसर्ग हिरवागार शालू नेसून आपला आनंद साजरा करतो. पक्षी आणि प्राणी नव्या जीवांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्या स्वागतासाठी नवीन घरटी बांधली जातात. सर्वत्र एक वेगळीच लगबग सुरू असते. हे सारे मी मोठ्या कुतूहलाने पाहत असतो आणि माझ्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतो.

पावसाळ्याइतकाच आनंददायी, पण त्याहून वेगळा अनुभव देणारा हा ऑटमचा ऋतू! या काळात निसर्गाचे विविध रंग पाहून अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटते. नुकताच आम्ही न्यूयॉर्क ते नायगरा असा प्रवास केला. संपूर्ण प्रवासात निसर्गाची अगणित रूपे आणि असंख्य रंग अनुभवायला मिळाले. सोनेरी पिवळा, हळदीसारखा पिवळा, केशरी, कुंकवासारखा लाल, हिरवा आणि या सगळ्या रंगांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या असंख्य छटा! या रंगांची उधळण झाल्यामुळे डोंगर अक्षरशः रंगीबेरंगी दिसत होते.

तुम्ही कधी असा रंगीबेरंगी डोंगर पाहिला आहे का? मी तर पहिल्यांदाच पाहत होतो आणि पाहतच राहिलो! दूरून पाहताना असे वाटत होते, जणू एखाद्या चित्रकाराने आपल्या कॅनव्हासवर वेगवेगळ्या रंगांचे असंख्य ठिपके रेखाटले आहेत.

हे दृश्य पाहताना मनात एक विचार आला. प्रत्येक पानाला जणू माहीत आहे की काही तासांनी किंवा काही दिवसांनी आपल्याला झाडापासून अलग होऊन जमिनीवर गळून पडायचे आहे. आपली जीवनयात्रा संपणार आहे. तरीही ते शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला अधिकाधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करते आणि निसर्गाच्या या रंगोत्सवात उत्साहाने सहभागी होते.

प्रत्येक झाड वेगळ्या रंगाने नटलेले होते. जणू काही त्यांच्यात एक मूक स्पर्धाच सुरू होती — कोण सर्वांत सुंदर दिसते याची! कुठे उंचच उंच वृक्ष होते, कुठे छोटी झुडपे होती, तर कुठे अगदी लहान रोपे होती. आकार वेगवेगळे, रंग वेगवेगळे; पण प्रत्येकाचे सौंदर्य स्वतःचे आणि अनोखे!

काय हा निसर्गाचा चमत्कार!

निसर्गाकडून शिकण्यासारखे किती तरी आहे. आपण वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर अनेकदा आपल्या दिसण्याकडे आणि व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करू लागतो. पण इथे तर काही तासांचे किंवा काही दिवसांचे आयुष्य उरलेली पानेसुद्धा आपले सौंदर्य मनापासून साजरे करत होती. मग आपल्या हातात असलेले आयुष्य आपण का नाही आनंदाने आणि उत्साहाने जगायचे?

यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते — तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा तुम्ही ते आयुष्य कसे जगलात, हे अधिक महत्त्वाचे आहे.

नायगारा धबधबा

याच प्रवासादरम्यान आम्ही नायगरा धबधबाही पाहिला. वरील छायाचित्रात दिसते त्याप्रमाणे, एका बाजूला नायगरा धबधबा आपल्या रौद्र आणि प्रचंड सामर्थ्यशाली रूपात कोसळत आहे, तर त्याच परिसरातील उंचवट्यांवर वृक्षराजी विविध मोहक रंगांनी नटली आहे. एका बाजूला पाण्याचा विराट आविष्कार, तर दुसऱ्या बाजूला रंगांची नाजूक उधळण! निसर्गाच्या या दोन भिन्न रूपांचे एकाच वेळी दर्शन घडणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.

हेच ऑटमचे खरे सौंदर्य! प्रत्येक झाड वेगळे, प्रत्येक रंग वेगळा आणि प्रत्येक रूप आकर्षक. नजर हटवावीशीच वाटत नाही.

या रंगोत्सवात कुठेही भेदभाव नाही. जिथे झाड आहे, तिथे निसर्ग आपल्या परीने रंगांची उधळण करताना दिसतो. खरे तर हा सृष्टीच्या परिवर्तनाचा काळ आहे. काही दिवसांत झाडांवरील पाने गळून पडतील. वृक्ष निष्पर्ण होतील. काही काळाने पुन्हा त्यांना नवी पालवी फुटेल आणि निसर्ग नव्या रूपात सज्ज होईल.

निसर्गाचे हे परिवर्तनही किती सुंदर आहे, नाही का?

आपण नेहमी म्हणतो, “This too shall pass” — हेही दिवस निघून जातील. निसर्गही जणू आपल्याला हाच संदेश देत असतो. आज जे सौंदर्य आपल्या डोळ्यांना भुरळ घालत आहे, ते कायमस्वरूपी नाही. काही दिवसांनी ही रंगीबेरंगी पाने गळून पडतील आणि निसर्गाचे रूप पूर्णपणे बदलेल.

मात्र, याचा अर्थ त्याचे सौंदर्य संपेल असा नाही. ते केवळ वेगळ्या रूपात आपल्यासमोर येईल.

आपण अनेकदा बदलाला विरोध करतो. परिचित गोष्टी सोडण्याची भीती वाटते. जे आहे ते तसेच राहावे, असे आपल्याला वाटते. पण निसर्ग आपल्याला शिकवतो की बदल म्हणजे नेहमी काहीतरी गमावणे नव्हे; बदल ही नव्या सौंदर्याची, नव्या सुरुवातीची आणि नव्या शक्यतांची चाहूलही असू शकते.

गळणारे पान आपल्याला आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देते, तर नव्या पालवीची चाहूल आशेचा संदेश देते. एकीकडे निरोप, तर दुसरीकडे नव्या सुरुवातीचे आश्वासन — निसर्गाचे हे चक्र अखंड सुरूच असते.

मग आपणही आयुष्यातील बदलांना घाबरण्याऐवजी त्यांचे स्वागत का करू नये?

चला, निसर्गाकडून हा सुंदर धडा शिकूया. आयुष्यातील प्रत्येक टप्पा आनंदाने जगूया, बदलांना मनापासून स्वीकारूया आणि प्रत्येक ऋतूचे सौंदर्य अनुभवत पुढे चालत राहूया. कारण आयुष्याचे खरे सौंदर्य केवळ स्थिर राहण्यात नाही, तर प्रत्येक बदलासोबत नव्याने फुलण्यात आहे!


Discover more from Awesomeplaces

Subscribe to get the latest posts sent to your email.

Published by Mukund Karadkhedkar

Engineer by profession and Wildlife Photographer by passion. Loves nature.

Leave a Reply

Discover more from Awesomeplaces

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading