दुरदृष्टी

आज बागेतल्या त्या sinior citizen कट्ट्यावर गर्दी दिसत होती. सर्वजण हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारत होते. फक्त नाना आपले शून्यात नजर लावून बसले होते. अचानक देशपांडेंचे त्यांच्याकडे लक्ष गेले. आज नाना असे विमनस्क अवस्थेत का बसले आहेत. तसे नाना खूप बोलके न्हावते पण संगळ्यांच्या गप्पात ते सहभागी होत.

देशपांडे विचार करू लागले की त्यांना कोणी ग्रुप मधले बोलले असेल का? पण हा जेष्ठ लोकांचा कट्टा खूप दिवस असाच चालू आहे व मतभेद असले तरी सर्वजण आयुष्याच्या अशा टप्प्यावर आले आहेत की राग लोभ किंवा समज गैरसमज या पलीकडे पोहोचले आहेत. बर नाना तसे सुखवस्तु कुटुंबात रहातात.

नाना म्हणजे गोपालराव विधाते. काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागातून निवृत्त झाले. अतिशय प्रामाणिक व मितभाषी गृहस्थ. त्यांना दोन्ही मुलंच होती. दोघांचे पण लग्न झाले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांचे नाव राधाबाई विधाते. पण सर्वजण त्यांना माई म्हणूनच ओळखत. त्या अतिशय धूर्त व व्यवहार चतुर होत्या. पण लहान मुलाचे लग्न झाल्यानंतर सहा महिन्यातच त्या गेल्या.

नानांचे जवळच छान दुमजली घर होते. नानांनी आधीच दोघांना एकेक मजला दिला होता. वरच्या मजल्यावर मोठा राहात होता व छोटा खाली रहात होता. माई गेल्यावर नाना सहा महिने मोठ्या मुलाकडे तर सहा महिने छोट्या मुलाकडे रहात होते. ही व्यवस्था दोन सुनांनी ठरवली होती. नानांनी ती निमुटपणे स्वीकारली होती. त्यांनी विचार केला की बहुतेक दोघी सुनांना माझी सेवा करता यावी म्हणून अशी व्यवस्था केली असणार.

असो, शेवटी श्याम देशपांडे नाना जवळ आले आणि त्यांना विचारले की नाना काय झाले , आज तुम्ही असे गप्प गप्प का? तब्येत बरी नाही का? नानांनी त्यांच्याकडे बघितले व म्हणाले , नाही श्यामराव आज जरा विपरीत घडले. मला काही सुचत नाहीये काय करावे. त्यावर श्यामराव म्हणाले की नाना जरा विस्ताराने सांगता का? त्यावर नानांनी सांगायला सुरुवात केली –

अहो आज काय झाले की माझा मोठ्या सूनेकडे राहायचा काळ दोन दिवसात संपतो आहे. आणि दोन दिवसांनी मी छोट्या सूनेकडे राहायला जाणार होतो. पण छोटी सून वरती येऊन मोठी ला म्हणाली की मला पुढचा महिनाभर माहेरी जायचे आहे करण आईची प्रकृती ठीक नाहीये आणि तिला मदत पाहिजे. त्यावर मोठी म्हणाली की पुढचे सहा महिने नाना तुझी जवाबदारी आहेत त्यामुळे तू ठरव काय करायचे ते. छोटी नी खूप विनंती केली पण मोठी तिच्या मतावर ठाम होती. माझा मोठा मुलगा सुद्धा तिथेच होता पण नुसता बसून ऐकत होता. याचा अर्थ त्याची पण याला मुक संमती होती. मोठी ची इथपर्यंत मजल गेली की ती म्हणाली की तुम्हाला अडचण असेल तर त्याना अनाथाश्रमात पाठवा. ह्यावर सर्वजण शांत बसले व छोटी म्हणाली की मी नवऱ्याला विचारून ठरवते . नाना हे ऐकून खूपच व्यथित झाले. ते तडक सीनियर सिटिझन कट्ट्यावर आले. याक्षणी प्रकर्षाने त्यांना माईंची आठवण झाली.

हे सगळं ऐकून सगळेच शांत झाले आणि विचार करू लागले की आता काय करायचं. तेवढ्यात तोषणीवाल वकील पुढे आले. ते म्हणाले की नाना तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. त्यावर नाना म्हणाले की मला बिलकुल कोर्ट कचेरी नाही पाहिजे. तोषणीवाल वकील जरा विचार करून म्हणाले की मला एक सांगा की घर कोणाच्या नावावर आहे. नानाना लगेच माईंची आठवण आली.

तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. जेंव्हा माई शेवटच्या घटका मोजत होत्या तेव्हा त्यांनी नानाना सांगितले की घर मुलांच्या नावावर करायचे नाही. नानांनी खूप सांगून पाहिले पण माई मात्र ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी त्यांनी नाना कडून तसे वचन घेतले की मरेपर्यंत घर नानांच्या नावावर राहील. त्याप्रमाणे अजूनही घर त्यांच्याच नावावर होते.

नाना तोषणीवाल वकिलांच्या प्रश्नाने भानावर आले. त्यांनी सांगितले की घर माझ्याच मालकीचे आहे. तोषणीवाल वकील खुशीत म्हणाले की आता तुम्ही काळजी सोडा, मी पुढचे बघून घेईल. मग त्यांनी नानांच्या कानात आपला प्लान सांगितला. त्याप्रमाणे ते लगेच कामाला लागले. त्यांनी आपल्या ऑफिस मध्ये फ़ोन करून काही कागदपत्र घेऊन येण्यास सांगितले.

तासाभरात त्यांचा सहाय्यक वकील सर्व कागदपत्र घेऊन आला. त्यावर त्यांनी नानांची सही घेतली व नानाना म्हणाले की ठरल्या प्रमाणे उद्या सकाळी दहा वाजता तुम्ही मॉर्निंग शो ला निघून जा. तोषणीवाल वकील शहरातले अतिशय हुशार व यशस्वी वकील होते. तो खूप सच्चा आणि मदतीला धावणारा सदगृहस्थ होता त्यामुळे नानांनी काही विचार न करता सही केली.

ठरल्याप्रमाणे नाना व श्याम देशपांडे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सिनेमा बघायला गेले. बरोबर साडे अकराच्या सुमारास तोषणीवाल वकील नानांच्या घरी आले. मुद्दाम ते वरच्या मजल्यावर आले व गोपाळराव विधाते ची चौकशी करू लागले. अपेक्षेप्रमाणे मोठ्या सुनबाई व मुलगा समोर आले व म्हणाले की बोला काय काम आहे. गोपाळराव इथेच रहातात. त्यावर वकील साहेब म्हणाले की मी फक्त घर बघायला आलो आहे. सुनबाई नी त्यांना घरात यायला सांगितले आणि मग मोठ्या सुनबाई नी विचारले की तुम्हाला घर का बघायचे आहे.

तोषणीवाल वकिल घर सगळीकडे फिरून बघायचे नाटक करत होते. तेंव्हाच मोठ्या सुनबाईंचा प्रश्न आला. तोषणीवाल वकिल त्यावर उत्तरले की हे घर मी विकत घेतले आहे त्यामुळे मला ते बघायचे होते. त्यांच्या उत्तराने मोठा मुलगा आणि सन उडालेच. त्यांचा चेहरा बघण्या सारखा झाला होता. मोठ्या सुनबाई नी जोर जोरात छोटी ला हाक मारायला सुरुवात केली. ए सरिता पटकन वरती ये हे बघ काय सांगत आहेत. छोटी पण लगेच पळत वरती आली. तिला सगळी हकिकत मोठी ने सांगितली आणि ते ऐकून छोटी मटकन खालीच बसली.

तोषणीवाल वकील मनोमन खूष झाले की गोष्टी आपल्या प्लान प्रमाणे चालल्या आहेत. तेवढ्यात नानांचे मोठे चिरंजीव उठले आणि तावातावा नी बोलू लागले की नाना असे कसे घर विकू शकतात. आम्ही कुठे राहाणार आणि नाना तरी कुठे रहाणार. तोषणीवाल वकिल म्हणाले की तो माझा प्रश्न नाही तो तुमचा कौंटुंबिक प्रश्न आहे. कोणी कुठे राहायचे हे तुम्ही ठरवा. माझ्याकडे घराची कागदपत्र आहेत आणि मी पुढच्या दोन दिवसात तुम्हाला घर खाली करून द्यायला सांगतो आहे.

हे ऐकल्यावर घरात अजून गोंधळ उडाला. तेवढ्यात श्याम देशपांडे आणि नाना आले. लगेचच दोन्ही सुना व मोठा मुलगा त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले की नाना हे वकील सांगतात ते खरं आहे का?

नाना जरा सावरून बसले व त्यांनी बोलायला सुरुवात केली. हो ते सांगतात ते बरोबर आहे. तुम्ही दोघींनी मिळून मला वृद्धाश्रमात पाठवायचे ठरवले तेंव्हा मी खूप विचार केला आणि ठरवले की आपण हे घर विकून छान जेष्ठांच्या housing complex मधे राहायला जाऊ. तिघे सगळ्या सोई आहेत. चहा नाश्ता आणि जेवण आयते मिळेल व समवयस्क मंडळी बरोबर वेळ पण चांगला जाईल.

हे ऐकताच दोन्ही सूनांना त्यांची चूक समजली आणि त्यांनी नानांच्या पायावर लोळण घेतली. हात जोडून त्यांची माफी मागितली. नाना आम्हाला माफ करा. आमचे चुकले. आम्ही हे विसरून गेलो होतो की आम्ही तुमच्या घरात राहतो आहोत, तुम्ही आमच्या घरात नाही रहात. पुन्हा असे होणार नाही आम्हाला माफ करा. तुम्हाला जिथे राहायचे आहे तिथे पाहिजे तेवढे दिवस रहा.

अभावितपणे नानां माईंच्या फोटो समोर जाऊन उभे राहिले व म्हणाले माई तुझ्या दूरदृष्टीला सलाम. आज तुझ्यामुळे मी या घरात आनंदाने राहू शकलो.

——-॰——-


Discover more from Awesomeplaces

Subscribe to get the latest posts sent to your email.

Published by Mukund Karadkhedkar

Engineer by profession and Wildlife Photographer by passion. Loves nature.

Leave a comment

Discover more from Awesomeplaces

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading