
आज सकाळी ९.३० वाजता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आम्ही पांच जण जीप मध्ये आहोत.
बाहेर पावसाळी वातावरण आहे. कधी ऊन कधी पाऊस असे चालू आहे. मन उदास आहे माहीत नाही वातावरणा मुळे आहे की मसाई मारा सोडून जातोय म्हणून आहे.
गाडीत ६० व ७० च्या दशकातले गाणे चालू आहेत. मन कधी त्या काळात जाते तर कधी चित्त्याचा वेगाने परत मसाई मारा च्या ग्रासलॅंड मध्ये जातेय. डोळ्यासमोर सिंहांची फैमिली येतेय. त्या छोट्या बछड्याच्या लीला विसरू शकत नाही. त्याचे आईची शेपटी ओढणे आणि बाबांच्या डोक्यावर उड्या मारणे आणि भावाबरोबर खेळणे म्हणजे एक चांगला अनुभव होता.
सिंहांची कुटुंब व्यवस्था आणि आपली कुटुंब व्यवस्था यात खूप साम्य आहे. जसे की पुरुष कुटुंबाची सुरक्षा आणि व्यवस्थापन बघतात आणि आई सगळ्यांसाठी छान खाऊ बनवते तसेच सिंह त्यांच्या साठी आपली सुरक्षित जागा शोधतो व त्यांचे सरंक्षण करतो. त्याला टेरिरेटरी असे म्हणतात. पण सगळ्या कुटुंबासाठी शिकार मात्र सिंहीण करते व पिलांचे संगोपन करते. मजेशीर गोष्ट म्हणजे खूप मेहनत करून शिकार करून सर्वात प्रथम सिंह ती शिकार खाणार व नंतर सगळ्यांचा नंबर लागेल.
आणि सिंहांच्या पूर्ण कुटुंबाने शिकार खाल्यावर हायना चा नंबर लागेल त्या नंतर जॅकल व नंतर vulture चा नंबर लागेल. तोपर्यंत हे सर्व जण शिस्तीत न भांडता वाट बघत बसतात. हे सर्व आम्ही मसाई मारा मध्ये अनुभवले.

मला अजूनही तो दिवस आठवतो जेंव्हा आम्ही सगळे नैरोबी विमानतळावर उतरून बाहेर नाश्त्या साठी थांबलो होतो. आम्ही एकूण दहा जण होतो. सर्वजण वन्यजीव छायाचित्रकार होते. सर्वजण कुतूहलमीश्रीत नजरेने सर्वदूर बघत होते. नवीन देश नवीन लोक आणि नवीन संस्कृती. कोणी म्हणे अरे बघा ह्यांच्या कडचा कावळा वेगळा आहे , आरे हा पक्षी किती सुंदर आहे. अशा वातावरणात आम्ही नाश्ता केला व मसाई मारा ला निघालो. खूपच उत्सुकता व उत्साह ओसंडून वाहत होता. कारण दोघांच्या अपवाद वगळता सर्वजण पहिल्यांदाच मसाई मार ला जात होतो. या पार्क बद्दल खूप ऐकले व पाहिले होते. साधारण पाच तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचलो.
मनात थोडीशी हुरहूर होती की आपल्याला काय दिसेल व कसे फोटो येतील. पण गेट मधून आत शिरताच मन थक्क झाले.
अवर्णनीय असे विस्तीर्ण गवताळ प्रदेश आणि त्यावर वेगवेगळे प्राणी चरत होते. अतिशय सुंदर निळेशार आकाश आणि त्याखाली पसरलेले हिरवेगार गवताळ मैदानं. ह्याला वन्यजीवांची पंढरी का म्हणतात ते लगेच कळते. नितांत सुंदर निसर्ग आणि जोडीला सगळे वन्य प्राणी ह्यापेक्षा जास्त देवाकडे काय मागणार. हे सगळं पाहून मन कृतार्थ झाले. असा गवताळ प्रदेश भारतामध्ये बघायला मिळत नाही.



आम्ही नाशिक ते मसाई मारा असा साधारण २७ तास प्रवास करून दुपारी दोन वाजता होटल मध्ये पोहोचलो. खर म्हणजे एवढा मोठा प्रवास करून आम्ही खूप दमलो होतो पण तो थकवा पार्क बघून निघून गेला. आम्ही सगळे जण जेवण करून लगेच सफारी साठी निघालो. आम्ही दुपारी चार ते संध्याकाळी सात पर्यंत सफारी केली. त्यानंतर दोन दिवस आम्ही दिवस भर सफारी केली आणि एक दिवस सकाळ संध्याकाळ सफारी केली. संध्याकाळी सफारी करून आल्यावर आंघोळ करणे व श्रमपरिहार करून जेवण करणे व नंतर झोप घेणे असा कार्यक्रम होता. जेवण झाल्यावर पोट भरायचे पण मन नाही भरले. आपले भारतीय खाद्यपदार्थ आम्ही खूप मिस केले.
एकूण साडेतीन दिवसाच्या सफारी दरम्यान आम्ही सर्व प्राणी आणि पक्षी बघितले. बिग नाइन म्हणून जे प्रसिध्द आहे ते सर्व आम्ही पाहिले. त्यात Buffalo, Elephant, Lion , Leopard ,Rhino , Cheetah, Giraffe, Hippo, Zebra असे प्राणी येतात.
पहिल्याच दिवशी आम्हाला सिंहांचा मोठा प्राइड दिसला. त्या जंगलाच्या राजाने त्याच्या डौलदार चालीने आमचे सर्वांचे मन जिंकून घेतलं. आम्ही फोटो काढायचे विसरून फक्त बघत राहिलो. त्याची सगळीच ऐट वेगळी होती.


आम्हाला तिथे त्या सिंहाच्या फॅमिलीने मारलेले एक मोठे जनावर दिसले बहुतेक जंगली म्हैस असावी कारण फक्त तिच्या छातीचा पिंजरा आणि शिंगे दिसत होती बाकी सर्व सिंहांनी खाऊन फस्त केले होते. आता त्यावर hyena ( तरस ) आणि vultures ( गिधाडे ) ताव मारत होती. सिंहाची फैमिली नुसती झाडाखाली लोळत होती. सगळे छान जेवण करून सुस्तावले होते.
आमच्या सर्वांचे लक्ष वेधले त्या कुटुंबातील दोन सिंहाच्या पिल्लाने. त्यातील एक खूप लहान होते तर एक थोडेसे मोठे होते. दोघेही खूप खेळत होते. एकमेकांच्या अंगावर उड्या मारणे, लहान्याची शेपटी तोंडात धरून चावणे आणि एकमेकांच्या अंगावर उड्या मारणे असे त्यांचे खेळ चालू होते. दोघेही पिल्ल इतके छान आणि निरागस होते की त्यांना जवळ घेऊन त्यांचे लाड करावेसे वाटत होते. पण शेवटी ते सिंहाची पिल्ल होते. त्यामुळे आम्ही फक्त त्यांचे फोटो काढले.



अर्थात फोटो काढण्यापूर्वी प्रत्येक जण त्यांच्या सोयीप्रमाणे आमच्या ड्राइवर ला सूचना देत होते कारण फोटो चांगला येण्यासाठी प्रकाश चांगला असला पाहिजे. हे सर्व करत असताना आम्ही त्या सिंहांना मात्र सारखे डिस्टर्ब करत होतो. मला हे खूप आवडले नाही . आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना असे डिस्टर्ब करणे योग्य नाही. पण त्यांना ह्याची सवय असावी कारण ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना बिलकुल त्रास झाला नाही.


त्यानंतर आम्ही पुढे गेल्यावर जिराफ च्या ग्रुप नी आमचे स्वागत केले. आम्ही सगळे फोटो काढायचे विसरून त्यांच्याकडे बघत बसलो. उंच मानेचा व अंगावर सुंदर नक्षी असलेला हा एक मोठा प्राणी आहे. निरभ्र आकाशाचा पार्श्वभूमीवर हा प्राणी खूप छान दिसत होता. त्याचे भरपूर फोटो काढून आम्ही पुढे निघालो.


त्यानंतर कैप्टेन ने जेवणाची सुट्टी झाल्याची घोषणा केली. आम्ही सर्वजण मग एक मोठ्या झाडाखाली थांबून वनभोजन केले. काय खाल्ले ते आठवत नाही पण सभोवतालचा सुंदर निसर्ग अजूनही डोळ्यासमोरून जात नाही.


अचानक आमच्या ड्राइवर ला मेसेज आला की तिकडे चित्ते दिसले आहेत. आमची जीप वाऱ्याच्या वेगाने चित्ते बघायला निघाली. आम्ही सर्वजण खूप खुशीत होतो कारण चित्ते आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. आम्ही तिथे पोहोचल्यावर असे दिसले की दोन female चित्ते झाडाखाली बसून आराम करत होते. बहुतेक त्या दोन बहिणी शिकार करून दामल्या असतील आणि आराम करण्यासाठी बसल्या असतील. आमचा ड्रायवर म्हणाला की त्यांची शिकार एथेच कुठेतरी असेल. आम्ही त्यांचे फोटो काढले व तिथेच थांबलो. थोड्या वेळाने त्या झाडाच्या मागील गवतात जाऊन बसल्या. आम्ही लगेच गाडी तिकडे नेली तर त्या दोघी पण त्यांच्या kill वर ताव मारत होत्या. बहुतेक त्या खूप भुकेल्या असतील. तेवढ्यात आमच्या गाडी मधून कोणीतरी विचारले की काय kill आहे. मग आम्ही नीट निरीक्षण केले तेव्हा कळाले की ते हरिणाचे पिल्लू आहे ( Thompson Gazelle ). कुठल्याही प्राण्यांचे लहान पिल्लं खूपच गोंडस दिसतात. मी विचार करत होतो की त्या हरिणाच्या पिलाच्या आई च्या दुखात सहभागी होऊ की चित्याच्या दोन बहिणीना खूप दिवसांनी खयाल मिळाले म्हणून आनंदी होऊ. शेवटी देवाची करणी म्हणून शांत झालो.



मासाई मारा च्या या गावताळ प्रदेशात दररोज भक्ष आणि भक्षक यांचा जीवन मरणाचा खेळ सुरू असतो. भक्ष असलेल्या प्राण्यांना हे चांगलेच माहिती असते की कुठल्याही क्षणी आपल्यावर हल्ला होऊ शकतो व तो आपला शेवटचा क्षण असेल. त्यामुळे हे प्राणी अतिशय सतर्क असतात व काळापामध्येच राहतात. त्या नंतर पुढे जाताना आम्हाला हत्ती दिसले. का कुणास ठाऊक पण आम्हा भारतियांना हत्ती हा प्राणी खूप आपलासा वाटतो. खूप मोठे कान व मोठे मोठे दांत असलेला हा प्राणी खूपच रुबाबात चालत जात होता. हे प्राणी पण सिंहाचे भक्ष असल्यामुळे खूप सावध असतात व नर हत्ती हा आपल्या कुटुंबाचे रक्षण करतो. हत्तींचे आम्ही सर्वानी खूप फोटो काढले.



आम्ही इतरही खूप प्राणी बघितले जसे की रानडुक्कर ( Warthog ), Common Eland आणि रानमांजर ( Serval Cat ) त्याचे फोटो खालील प्रमाणे




दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सिंहानी शिकार खाऊन उरलेल्या मांसावर ताव मारत असलेले तरस ( Hyna ), कोल्हा ( Jackel ) व गिधाडे ( Vultures ) दिसली. नुकताच सूर्य वरती आला होता त्यामुळे हा फोटोग्राफी साथी उत्तम वेळ होता. याला golden light असे देखील म्हणतात. त्या light मध्ये आम्ही काही फोटो काढले. Digital Camera च्या युगात असे फोटो काढणे म्हणजे एक कसरत होती. खालील सगळे फोटो golden light मध्ये काढलेले आहेत.


मासाई मारा मध्ये खूप पक्ष्यांच्या जाती पण बघायला मिळतात. काही फोटो खाली आहेत.




अश्या रीतीने भरपूर फोटोग्राफी व निरीक्षण करून आमची मासाई मार ची ट्रीप सफल संपूर्ण झाली. काही पक्ष्यांचे व प्राण्यांचे फोटो खाली देत आहे. तुम्हाला जर निसर्गाची आवड असेल तर एकदा जरूर भेट द्या.




Discover more from Awesomeplaces
Subscribe to get the latest posts sent to your email.
Nice
LikeLiked by 1 person
Thank you so much ☺️
LikeLike