Short Story – चौकटी बाहेरचे आकाश

सारा एकटक त्या खिडकी मधून बाहेर बघत होती. हा तिचा रोजचाच दिनक्रम असायचा. हॉस्पिटल च्या बेड वर पडल्या पडल्याच ती खिडकीतून बाहेर बघत बसायची. रोज ती नवीन स्वप्न बघत असायची. खिडकीतून तिला अतिशय सुंदर असे आकाश दिसायचे. आणि मग ती त्या आकाशभोवती आपले जग शोधत असायची.

दररोज तिला ढगातून वेगळे वेगळे प्राणी भेटायला यायचे. कधी तिला अस्वल दिसायचे, तर कधी वाघ दिसायचा. आज तिला ढगात छान ससा दिसत होता. ती मनाने ढगात जाऊन त्याच्याशी खेळून पण आली. त्याचे लाल गुंजासारखे डोळे आणि मऊ पांढर केस खूप छान होते. तेवढ्यात तिला बाबांची हाक ऐकायला आली आणि तिची तंद्री भंगली.

सारा बेटा मी डॉक्टर काकांशी बोललो आहे आणि ते म्हणाले की आपल्याला पुढच्या आठवड्यात घरी जाता येईल. सारा गेल्या 6 महिन्यापासून हॉस्पिटल मध्ये बेड वर झोपून होती. अवघ्या सहा वर्षाचे ते कोवळे वय . खेळायचे बागडायचे दिवस पण तिच्या नशिबात एथे पडून राहण्या शिवाय पर्याय न्हवता. तिच्या मेंदू मध्ये गांठ झाली होती आणि डॉक्टर काका त्यावर इलाज करत होते. तिला तो दिवस आठवला. त्या दिवशी तिला अचानक खूप डोक दुखत होत आणि ती बेशुद्ध पडली आणि जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती या हॉस्पिटल च्या बेड वर होती. आता तिला खूप बरे वाटत होते.

ती परत तिच्या स्वप्नांच्या दुनियेत रमली. खिडकी बाहेरचे आकाश तिला खुणावत होते. तिच्या दुनियेत खिडकी बाहेर एक सुंदर बाग होती. त्या बागेत रंगीबेरंगी फुलांची झाडे होती आणि छान कारंजा होता. बागेत खूप लहान मुले खेळत होती. आजी आजोबा बरोबर ती आली होती. तिथे फुगेवाला पण होता आणि पॉपकॉर्न वाला पण होता. तिला ख़ुपदा असे वाटायचे की त्या फुग्याचा दोरा धरून फुग्याबरोबर आपण पण उंच उडत जावे आणि जमिनीवरची गंमत आकाशातून बघावी.

बागेत रंगीबेरंगी फुलपाखरे पण मस्त उडत होती. ती नेहमी त्या फुलपाखराना पकडायला धावायची पण ती कधी त्यांना पकडू शकली नव्हती.

बागेच्या पलीकडे एक तलाव होता व त्यात छान बदके होती. संथपणे ते पाण्यात पोहत असत व त्यांच्या सोबत त्यांचे छोटे पिल्ल पण होते. तिला खुपदा त्या बदकांना हात लवायची इच्छा व्हायची पण जवळ गेले की ते लांब पळून जायचे.

बागेत खेळायला घसरगुंडी होती व झोका होता. तिला तिथे खेळायला खूप आवडायचे. उंच झोका नेला की दूरचे डोंगर दिसायचे.

साराला आता असे झाले होते की मी कधी एकदा या खोलीच्या बाहेर जाते व माझी स्वप्नातली दुनिया बघते. आणि तो दिवस आला. त्या दिवशी डॉक्टर काकांनी तिला तपासले व सांगितले की सारा आता तू घरी जाऊ शकतेस. तिला खूप खूप आनंद झाला होता.

त्यादिवशी बाबानी सकाळीच सांगितले की सारा आज आपण घरी जाणार. त्या दिवशी तिची आई पण आली होती. आल्या आल्याच आईने सांगितले की आज्जीने तिच्यासाठी छान खाऊ बनवून ठेवला आहे. पण सारा ला तिच्या स्वप्नातील बाग बघायची होती.

सर्व कागदपत्र पूर्ण करुन बाबा सकाळी ११ वाजता रूम मधे आले व निघायची सूचना दिली. सर्वजण हॉस्पिटल मधून निघाले. आईने साराचा हात धरला होता.

हॉस्पिटलच्या बाहेर निघताना साराने डोळे मिटून घेतले व गेट च्या बाहेर आल्यावरच उघडले. पण डोळे उघडताच तिला धक्का बसला. तिने आजूबाजूला नजर टाकली तर तिला कंपाऊंड च्या बाहेर एक घाणेरडा नाला वाहताना दिसला. त्याच्या बाजूला कचरयाचा ढीग दिसला व त्यावर कावळे काव काव करत होते. तिला बाग किंवा काहीच दिसल नाही. टी मनाशीच विचार करू लागली की मी रोज बघते ती सुंदर बाग कुठे आहे आणि तलाव व डोंगर काहीच दिसत नाहीये. तिला अचानक जाणीव होते की आपण तर आकाशाकडे बघून स्वप्न रंगावत होतो.

तिचा खूप हिरमोड झाला व तिने आपले डोळे मिटून घेतले व शांतपणे गाडीत बसून घराकडे निघाली.

तिला बिचारीला काय माहिती की वास्तवातले जग स्वप्नांतल्या दुनिएपेक्षा खूप वेगळे आहे.


Discover more from Awesomeplaces

Subscribe to get the latest posts sent to your email.

Published by Mukund Karadkhedkar

Engineer by profession and Wildlife Photographer by passion. Loves nature.

Leave a comment

Discover more from Awesomeplaces

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading